अहिल्यानगर येथे स्नेहालयची ३ दिवसीय सेवा संवर्धन कार्यशाळा उत्साहात संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : “स्नेहालय संस्थेच्या सेवाभावी आणि रचनात्मक कार्याचा वटवृक्ष समाजातील हजारो निराधार वंचिताना मोलाचा आधार देत आहे. संस्थेच्या उभारणीत गिरीश कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कष्ट आणि मेहनत मोठी आहे. स्नेहालयच्या या सेवाभावी आणि रचनात्मक कार्यातून समाजातील कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी”, असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेच्या विश्वस्त अरुणा जगियासी यांनी स्नेहालय मधील कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी केले.
स्नेहालय संस्थेच्या वतीने दि. २६ ते २८ डिसेंबर, २०२५ या कालावधीत अहिल्यानगर स्नेहालय प्रकल्प येथे ३ दिवसीय सेवा संवर्धन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते राजीव भक्ती संदिप परब, भाईदास माळी, संपदा सुर्वे, शैलेंद्र कदम तसेच संस्थेच्या विश्वस्त अरुणा जगीयासी यांची सक्रिय उपस्थिती होती. या कार्यशाळेत स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी ‘सामाजिक संस्थांमध्ये कार्यकर्ते कसे टिकवावे’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी स्नेहालयचे विश्वस्त शशिकांत सातभाई यांनी सामाजिक संस्थांचे व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी सखोल माहिती दिली. तर रिमा अमरापूरकर यांनी जनसंपर्क कसा वाढवावा व प्रीती गोखले यांनी देणगीदार कसे वाढवावेत व दीर्घकाळ कसे टिकवावेत, यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान आर्थिक व्यवस्थापन या विषयावरही उपयुक्त सत्र घेण्यात आले.
या कार्यशाळेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सहभागी कार्यकर्त्यांना हिम्मत ग्राम, मानस ग्राम, अनामप्रेम, सेवावस्ती, बालभवन आणि स्नेहांकुर या विविध अशा प्रकल्पांना भेट देण्याची संधी मिळाली. या भेटींमुळे स्नेहालयच्या प्रत्यक्ष कार्यपद्धती, सेवा मॉडेल आणि पुनर्वसन प्रक्रियेचे प्रत्यक्ष अनुभव कार्यकर्त्यांना मिळाले. या कार्यशाळेमुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना व्यवस्थापन, जनसंपर्क, निधी संकलन व तंत्रज्ञानाचा उपयोग याबाबत नवी दिशा व प्रेरणा मिळाली, अशी भावना सहभागी कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.












