नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभर समुद्र किनारा स्वच्छता अभियान
ओरोस (प्रतिनिधी) : स्वच्छ समुद्र किनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्याल येणारे देशी – विदेशी पर्यटक हे समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात भेटी देतात. जिल्ह्यात येणा-या पर्यटकांना आपण जर स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे देऊ शकलो तर भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्याला भेटी देतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्हास्तरीय समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. या मोहीम अंतर्गत 1779 किलो कचरा आणि 1035 किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 1 जानेवारी, 2026 रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी श्रमदानाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा शुभारंभ ग्रामपंचायत वेंगुर्ला तालुक्यातील मेढा येथे करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास मेढा सरपंच अवधुत रेगे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक कृषी अधिकारी दीक्षांत कोळप, पाणी व स्वच्छता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, रुपाजी किनळेकर, मनिष पडेत, स्नेहल पिंगुळकर आदी उपस्थित होते.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्वच 33 समुद्र किनारी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण 1779 किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील 13 समुद्र किनारी 403 जनांच्या उपस्थितीत 500 किलो कचरा एकत्र करण्यात आला. तर मालवण तालुक्यात 163 जणांच्या उपस्थितीत 9 समुद्र किनारे स्वच्छ करण्यात आले असून 923 किलो कचरा जमा करण्यात आला आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील 11 समुद्र किना-याच्या स्वच्छतेकरीता 337 लोकांनी पुढाकार घेत 356 किलो कचरा गोळा केला आहे. जिल्ह्यातील 33 समुद्र किना-याच्या स्वच्छता कार्यक्रमांत एकूण 1035 किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे. या कच-याचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.













