सावित्री व्हायचं…!

डॉ. रुपेश पाटकर

सावित्री व्हायचं
म्हणजे नऊवारी साडी नेसून
कपाळावर आडवं कुंकू लावून
आवेशानं भाषण करणं नव्हे, राई!
ते तर अभिनय करणं आहे…

सावित्री व्हायचं…
म्हणजे समाजासाठी वयाची वीशी ओलांडण्याआधीच बंड करायचं
म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणं हेच प्रोफेशन बनवायचं
म्हणजे जोतिबांच्या प्रत्येक सामाजिक कामात झोकून द्यायचं
म्हणजे बंडखोर विचारांसाठी सासर तोडायचं
म्हणजे विधवेला बोडकं करण्याविरूद्ध न्हाव्यांचा संप करायचा
म्हणजे जात्यांधांच्या विकृतीविरूद्ध घरचा हौद अस्पृश्यांना मोकळा करायचा
म्हणजे फसवल्या गेलेल्यांची बाळंतपणं काढायची
म्हणजे वंचितांसाठी घर मोकळं करायचं
म्हणजे घराचा आसरा करायचा

मग मी आणि माझं राहतं कुठे?
सर्वच बळी द्यावं लागतं
स्वतःचा मुलगा सुद्धा…
आणि स्वतःला सुद्धा…
मग घर देखील विकलं जातं शंभर रुपयात…

डॉ. रुपेश पाटकर

error: Content is protected !!