संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात कलमठ ग्रामपंचायतीला तालुक्यात प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२४-२५ अंतर्गत कणकवली तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कलमठ ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात सातत्यपूर्ण व प्रभावी काम केल्यामुळे ही निवड करण्यात आली आहे.

या अभियानाअंतर्गत कलमठ गावात हगणदारीमुक्त गाव संकल्पना यशस्वीपणे राबवण्यात आली. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा व्यवस्था, ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, तसेच घरगुती व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर यावर विशेष भर देण्यात आला. ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करत आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्याचे प्रयत्नही करण्यात आले. गावातील रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता, पाणी साठ्यांची स्वच्छता व संरक्षण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन असे विविध उपक्रम सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य व कर्मचारी यांच्या सहकार्याने राबवण्यात आले. या सर्व उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कलमठ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमांमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून काम करत असताना नागरिकांचे भक्कम सहकार्य लाभत असल्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२४-२५ मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!