संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत निराधार, श्रावणबाळ योजनांसाठी मोठा निर्णय; ५१ प्रकरणांना दिली मंजुरी

अध्यक्षपदी निवडीबद्दल शरद कर्ले यांचे तहसीलदारांकडून अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. निवडीनंतर झालेल्या समितीच्या पहिल्याच बैठकीत एकूण ५१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली, त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

येथील तहसील कार्यालयात शरद कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण तसेच समिती सदस्य सुजाता हळदिवे, गौतम खुडकर, विजय कतरूड, दीपक दळवी, भगवान दळवी आदी उपस्थित होते. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ३४ प्रकरणे, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत १३ प्रकरणे, तर राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत ४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

तालुक्यातील अनेक गरजू कुटुंबांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना यांची सविस्तर माहिती नसल्याने ते लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रांची माहिती सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष शरद कर्ले यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २१ हजार रुपयांपेक्षा कमी असावी, अशी अट असल्याने अनेक पात्र लाभार्थी वंचित राहत आहेत. त्यामुळे ही उत्पन्न मर्यादा वाढवावी, तसेच लाभार्थ्याचा मुलगा २५ वर्षांचा झाल्यानंतर योजना बंद होण्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला असून, सर्व सदस्यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!