मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत झालेल्या व सुरू असलेल्या उपक्रमांची सीईओ रविंद्र खेबुडकर यांच्याकडून पाहणी

अभियान गीत व प्रसार व्हिडिओचे अनावरण

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत घोणसरी येथे विकासकामांचा धडाका सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी नुकतीच या ग्रामपंचायतीला भेट देऊन सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची सविस्तर पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी घोणसरी धरण क्षेत्रालाही भेट दिली. मत्स्य पालनातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्थानिक महिला बचत गटांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धरणाच्या जलाशयात मत्स्य पालन करण्याची परवानगी मिळण्याबाबत मागणी केली. याबाबत सकारात्मक पावले उचलून बचत गटांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याबाबत श्री. खेबुडकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी एका विशेष व्हिडिओ सादरीकरणाद्वारे अभियानांतर्गत झालेली कामे आणि आगामी प्रकल्पांची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीने तयार केलेल्या ‘अभियान गीत’ आणि ‘प्रसार व्हिडिओ’चे अनावरण यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यटन आणि संवर्धन
ऐतिहासिक शिवगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘पर्यटन निधी’तून प्रस्ताव सादर करण्याबाबत सीईओनी ग्रामपंचायतीला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच प्रसाद दिलीप राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. वालावलकर, कृषी विस्तार अधिकारी श्री. कवटकर, घोणसरी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी, तंटामुकी अध्यक्ष अशोक राणे, पोलीस पाटील भालचंद्र राणे, व्हिडिओ क्रिएटर मंदार मराठे, पवन मराठे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या नियोजनावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून अभियानासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!