सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कवी नरेंद्रकुमार भिकाजी चव्हाण यांच्या चढणीचे मासे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सातारा येथील शिवराजमुद्रा संमेलनात हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समृद्धी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. बी. एन. खरात, आर. एस.पी. साताराचे डॉ. राजकुमार घारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कवी नरेंद्रकुमार चव्हाण (बीकुमार) हे कुडाळ तालुक्यातील मुळ सोनवडे तर्फ कळसुली गावचे रहिवाशी असून मराठी व मालवणी भाषेत काव्यलेखनात हे नाव ठळक होऊ लागले आहे. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘हरघर तिरंगा’, ‘भारत का संविधान’ या गीतांचे हिंदीतून लेखन केले आहे. तसेच ‘महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावर…या गीतातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वी नक्षत्रपुष्प काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. कवी बीकुमार यांच्या कविता विविध विषयाना स्पर्श करतात. चढणीचे मासे या काव्यसंग्रहासाठी कणकवली येथील रेडिओलॉजिस्ट कवी साहित्यिक डॉ सतीश पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनामुळे मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच मालवणी इंद्रदरबार या फार्स विनोदी नाटकाचे लेखनही त्यांनी केले असून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन मुंबई येथे त्याची नोंदणी झाली आहे. तेही लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर आहे.












