पालकमंत्री नितेश राणे यांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा”, “आमच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका”, “आमची शाळा बंद करू नका” अशा घोषणांसह आज विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. जिल्ह्यातील मुलं हेच आपलं भविष्य असून त्यांच्या शिक्षणावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी दिला. हा प्रश्न ‘तुम्ही विरुद्ध आम्ही’ असा नसून कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून वेगळे निकष ठरवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोकणासाठी स्वतंत्र निकष लागू करण्याबाबत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली. यापूर्वीही कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने वेगळे निकष लावावेत, अशी मागणी करण्यात आली होती. संबंधित शासन निर्णयाबाबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तातडीची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालय स्तरावर ठोस तोडगा काढून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचेही राणे यांनी नमूद केले. केवळ शब्दांपुरते आश्वासन न देता कृतीतून निर्णय दिसेल, असा विश्वास त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.













