खारेपाटण (प्रतिनिधी) : राजापूर लांजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कम्प्युटर अकॅडमीच्या वतीने खारेपाटण विभागातील सर्व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज सोमवारी खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले होते.
या मार्गदर्शन शिबिराचे उद्घघाटन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश ब्रम्हदंडे, खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक राजेश वारंगे, लक्ष्मीकांत हरयाण, संजय कापसे, संदीप पेंडुरकर,श्री. सोगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण हायस्कूलचे संगीत विभागाचे शिक्षक संदीप पेंडुरकर व संगीत विभागाचे विद्यार्थी यांनी राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धेत भारत देशात संगीत वादन या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संगीत शिक्षक श्री. पेंडुरकर सहभागी विद्यार्थ्यांचा शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने मंगेश गुरव यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या शिबिरात इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने इंग्रजी सायन्स तसेच गणित या विषयांसाठी मराठी / सेमी इंग्लिश दोन्ही प्रकारात तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तर या शिबिरात खारेपाटण विभागातील शेठ न. म. विद्यालय खारेपाटण, शेठ म. वी. केसरकर विद्यालय वारगाव, शेर्पे माध्यमिक विद्यालय तसेच कोर्ले घालवली माध्यमिक विद्यालय इत्यादी हायस्कूलच्या सुमारे १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या शिबिराकरिता गणित विषयासाठीं कासार्डे हायस्कूलच्या विधी मुद्राळे व वारगाव हायस्कूलचे हनुमंत वाळके यांनी तर इंग्रजी विषया करिता तळेरे हायस्कूलचे विनायक टाकले व सायन्स विषयासाठी इन्सुली, सावंतवाडी हायस्कूलचे शिक्षक संजय शेवाळे, कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सोनाली बांदेकर आदी तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे, रोटरी क्लब अध्यक्ष दयानंद कोकाटे, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे आयोजक मंगेश गुरव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भोर यांनी केले व सर्वांचे आभार सौ. कोकाटे यांनी मानले.












