देवगडचे ज्येष्ठ पत्रकार अयोध्याप्रसाद गावकर यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ओरोस येथे गौरव; देवगड पत्रकारितेचा शिरपेचात मानाचा तुरा

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ यंदा देवगड तालुक्यातील पुरळ गावचे सुपुत्र, लोकमतचे प्रतिनिधी आणि देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांना प्रदान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून ओरोस येथील जिल्हा पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अयोध्याप्रसाद गावकर यांनी लोकमतचे प्रतिनिधी म्हणून देवगड तालुक्यात प्रदीर्घ काळ पत्रकारिता केली आहे. केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता, त्यांनी देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वी कार्यकाळ सांभाळला आहे. एक अभ्यासू पत्रकार आणि यशस्वी आंबा बागायतदार म्हणूनही त्यांची जिल्ह्यात ख्याती आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा पत्रकार संघाने त्यांना यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर गावकर यांच्यावर संपूर्ण देवगड तालुक्यातून आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी झालेल्या या सन्मानामुळे देवगडच्या पत्रकारितेचा सन्मान वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सर्व क्षेत्रातील सहकारी मंडळींचे आणि हितचिंतकांचे आभार अयोध्याप्रसाद गावकर यांनी व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!