सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील राजघराण्याच्या पुढाकारातून ऐतिहासिक राजवाड्याच्या भव्य पटांगणात आजपासून चार दिवसीय दशावतार महोत्सवाला दिमाखदार सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक लोककलेचा ठेवा रसिकांसमोर सादर केला जाणार असून, विविध दशावतार नाट्यप्रयोगांची पर्वणी मिळणार आहे.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवराज श्रीमंत लखमसावंत भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेकडो वर्षांची परंपरा जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या चार दिवसांच्या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतार मंडळे आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये नाईक मोचेमांडकर, कलेश्वर नेरुर, दत्त माऊली वेंगुर्ला, जय हनुमान दांडेली, चेंदवणकर, सिद्धेश्वर कसई तसेच माऊली इन्सुली या प्रसिद्ध मंडळांचा सहभाग असणार आहे. ‘नीलमाधव’, ‘गोमय गणेश’, ‘भक्ती महिमा’ आणि ‘धर्मविजय’ यांसारखे एकाहून एक सरस नाट्यप्रयोग रसिकांना अनुभवता येणार आहेत.
दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत हा सांस्कृतिक सोहळा रंगणार असून, खटकेबाज संवाद, पारंपरिक वेशभूषा तसेच पखवाज–पेटीच्या सुमधुर साथीने साकार होणारा हा लोककलेचा आविष्कार पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.










