कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे १७ जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय, जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे संपन्न होणार आहे. कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांच्या मालिकेत यावर्षी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तरावर मर्यादित असून, इयत्ता नववी ते बारावी या गटातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रु. १०००/-, द्वितीय क्रमांकास रु. ७००/-, तृतीय क्रमांकास रु. ५००/- तर उत्तेजनार्थ रु. ३००/- अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी पुरस्कृत केली आहेत. स्पर्धेसाठी ठरविण्यात आलेल्या नियमांनुसार प्रत्येक स्पर्धकास सादरीकरणासाठी ७ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे.
१) सोशल मीडिया : चिंता व चिंतन
२) मोबाईल – विधायक की विघातक?
३) भारतीय शेतकरी : बळी की राजा?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे दिनांक १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तालुका पत्रकार समितीचे खजिनदार अजय सावंत (मो. ९४०५९२४५४८) यांच्याकडे नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी समितीचे अध्यक्ष विजय पालकर (मो. ९४२३३०३३४३) किंवा सचिव विठ्ठल राणे (मो. ९४०४७५३४४०) यांच्याशी संपर्क साधावा.

तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!