कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रविवारी रात्री सुमारे ११ ते २ या वेळेत झालेल्या वादातून हाणामारीचा प्रकार घडला. या घटनेत लोकेश विष्ट (वय ३३) याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेबाबत लोकेश विष्ट याच्या मित्राने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी लोकेश विष्ट याला सुरुवातीला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लोकेश विष्ट हा आपल्या दोन मित्रांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होता. तिघेही नशेच्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान एक अनोळखी व्यक्ती तेथे आली. ओळख नसतानाही झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने लोकेश विष्ट याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून पळ काढला.
या घटनेप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.












