कणकवली (प्रतिनिधी) : मल्लखांब केवळ शरीर बळकट करत नाही तर एकाग्रता, धैय, चिकाटी या गुणांचाही विकास करतो, मल्लखांबाच्या नियमित सरावाने आरोग्य सुधारते व आत्मविश्वास वाढतो असे उद्गार मल्लखांब महर्षी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब असोसिएशन कुडाळ आणि आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांब कार्यशाळा आयडियल इंग्लिश स्कूल येथे नुकती संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून ते बोलत होते. प्राध्या. हरिभाऊ भिसे यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच उदय देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जोशी, डी. जे. रुपारेल कॉलेजच्या निवृत्त प्राचार्या आणि आंतरराष्ट्रीय मल्लखांब खेळाडू नीता ताटके, बाळकृष्ण कावले, समीर राऊत, रणवीर सावंत, डॉ. प्रमोद घाडीगावकर, ज्ञानदा शिक्षण संस्था कार्याध्यक्ष बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्या. हरिभाऊ भिसे, सल्लागार डी. पी. तानावडे, आयडियलच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
मल्लखांब पूजनाने या कार्यशाळेचा प्रारंभ झाला. राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत यशस्वी खेळाडूंनी एकापेक्षा एक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यशाळेला इयत्ता तिसरी ते आठवीचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशाला सहशिक्षक हेमंत पाटकर यांनी केले.












