केंद्रीय शिक्षण व संरक्षण मंत्रालय आयोजित प्रोजक्ट ‘वीर गाथा’ साठी कासार्डे हायस्कूलच्या कु. सावी मुद्राळे राष्ट्रीयस्तरावर निवड

१९.२ कोटी विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय पातळीवर धडक

२५ जानेवारी रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दिल्लीत होणार सन्मान

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक विद्यालयाची इ‌. 6वी ची विद्यार्थिनी कु.सावी वैभव मुद्राळे हिची प्रोजेक्ट ‘वीर गाथा’ 5.0 ची या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमासाठी निवड झाली आहे. शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संपूर्ण भारतातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून तसेच 18 देशातील 91 शाळांचे असे एकूण विद्यार्थी 19.2 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यातून 100 विद्यार्थी निवडले. कु. सावी वैभव मुद्राळे हिने आपल्या सृजनशील आणि सर्जनशीलतेने व उत्कृष्ट सादरीकरणाने विशेष यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिला रु10,000/- रोख बक्षीस,प्रशस्तीपत्र व राष्ट्रीयस्तरावर सन्मान होणार आहे.
देशाचे संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंग यांच्या हस्ते हा सत्कार दिल्ली येथे 25 जानेवारी 2026 रोजी होणार आहे व विशेष अतिथी म्हणून गणतंत्र दिवसाची परेड ही पाहायला मिळणार आहे.

या यशासाठी तिला मुख्याध्यापिका बिसुरे बी. बी. पर्यवेक्षक राणे एस.व्ही. व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल असे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कु.सावी मुद्राळे हिच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तीच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!