कुडाळात शिवसेनेत बंडखोरी… वर्षा कुडाळकर अपक्ष लढणार

शिवसेनेला केला अखेरचा ‘जय महाराष्ट्र

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाप्रमुख तसेच व्हीजेएनटीच्या जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पिंगुळी आणि तेंडोली हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले असतानाही जागावाटपात हे मतदारसंघ भाजपकडे सोपवण्यात आल्याने, तसेच पक्षांतर्गत सुरू असलेल्या घुसमटीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद निवडणूक आपण तेंडोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याची घोषणा त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत बोलताना कुडाळकर म्हणाल्या की, शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यानंतर कुडाळ तालुक्यातील ७८ गावांमधील त्या एकमेव महिला पदाधिकारी होत्या. उपविभाग प्रमुख, तालुका प्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख अशी विविध जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. जिल्हा पातळीवरील जबाबदारी स्वीकारल्यानंतर कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाचही तालुक्यांत संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पक्षात कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळत नसून संघटनात्मक निर्णयांमध्ये दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक पातळीवर सतत मानसिक त्रास दिला जात असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार निलेश राणे यांच्याविषयी आपल्याला आदर असल्याचे सांगत, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होणारी घुसमट सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यामुळेच आपण शिवसेनेचा निरोप घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेंडोली व पिंगुळी हे शिवसेनेचे हक्काचे मतदारसंघ असताना ते भाजपला सोडण्याचा निर्णय मान्य नसल्यामुळे आपण शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह ओबीसी जिल्हाप्रमुख पदाचाही राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत साथ देणाऱ्या सीताराम चव्हाण, गडकरी, गुरव, साळसकर, बबन शिंदे, राजा गावकर, विश्वास गावकर, नीलम शिंदे, सरिता राऊत तसेच सर्व तालुकाप्रमुख आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. सध्या कोणत्याही अन्य पक्षात प्रवेश न करता, तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.

error: Content is protected !!