खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात अनेकजण इच्छुक

भाजप शिवसेना महायुती कडून उमेदवारी कोणाला मिळणार?

…तर शहर विकास आघाडी महायुतीला आव्हान ठरणार?

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप व शिवसेना शिंदे पक्षाकडून लगेचच जिल्ह्यातील निवडणूक या महायुतीच्या वतीने एकत्र येत संयुक्तिक लढणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून जाहीर करण्यात आले असून खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात यावेळी इच्छुक उमेदवाराची संख्या पाहता बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. महायुतीकडून खारेपाटण जिल्हा परिषद भाजपला तर खारेपाटण पंचायत समिती शिवसेना आणि तळेरे पंचायत समिती भाजपाच्या वाट्याला आल्याची माहिती आहे. आता या ठिकाणी कोणाला कुठे उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर अपेक्षित उमेदवार पक्षश्रेष्ठींकडून मिळाला नाही तर मात्र खारेपाटणमध्ये शहर विकास आघाडी देखील निवडणूक रिंगणात उतरणार असून महायुतीला शहर विकास आघाडी आव्हान देणार का ? हे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार आहे. दरम्यान खारेपाटण जिल्हा परिषदेसाठी एकूण ७ महिला उमेदवार तर पंचायत समिती करीता एकूण ७ पुरुष उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सध्याचे चित्र आहे.

खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघावर राणे यांचे अर्थात भाजप पक्षाचे वर्चस्व गेल्या तीन निवडणुकांत राहिलेले असून यावेळी मात्र भाजप पक्षांतर्गत अनेक उमेदवारांनी पक्षाकडे आपण इच्छुक असल्याचे अर्ज सादर केल्याचे समजते.तर या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम देखील पक्ष कार्यालयात सुरू असल्याचे समजते.मात्र महायुती झाल्यामुळे अनेकांना आपला हक्काचा कर्मभूमी असलेला इच्छुक मतदार संघ गमवावा लागण्याची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.त्यामुळे पक्ष श्रेष्ठींना इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.


खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात हे उमेदवार इच्छुक
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा इतर मागास महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे आणि महायुती मध्ये हा मतदार संघ भाजप पक्षाकडे आला असल्यामुळे भाजप पक्षातच अनेक महिला उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते.यामध्ये खारेपाटण सरपंच सौ प्राची देवानंद ईसवलकर,वायंगणी सरपंच सौ अस्मि प्रशांत लाड,खारेपाटण माजी ग्रा.पं सदस्य सौ उज्ज्वला विरेंद्र चिके,सौ अंजली सुधीर कुबल,तसेच खारेपाटण शिवाजी पेठ येथील महिला कार्यकर्त्या सौ किर्ती संकेत शेट्ये व सौ आरती अविनाश गाठे यांची नावे चर्चेत आहेत.तर शहर विकास आघाडी कडून शिवसेना उबाठा पक्षाच्या महिला कार्यकर्त्या श्रीम.मीनल जयदीप तळगावकर व सौ मनस्वी महेश कोळसुलकर यांचे नाव देखील चर्चेत आहे.


खारेपाटण पं.स. मतदार संघ भाजप की शिवसेना लढणार ?
शहर विकास आघाडी मुळे तिरंगी लढत होणार

महायुतीच्या जागावाटपात खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा भाजप कडे गेला असल्यामुळे खारेपाटण पं.स.मतदार संघ हा शिवसेना शिंदे पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता असून सीट कोणाला मिळेल ? हा प्रश्न सध्या उभा असला तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून खारेपाटण पं.स.मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे समजते. दरम्यान भाजप पक्षाकडून खारेपाटणचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर,नडगीवे माजी सरपंच श्री अमित मांजरेकर, खारेपाटण येथील भाजप कार्यकर्ते श्री राजेंद्र वरूणकर,श्री निरंजन चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज सादर केले असून याच मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षा कडून खारेपाटण ग्रा.पं. माजी सदस्य श्री रफिक नाईक, शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव युवा उद्योजक श्री सुकांत वरूणकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते.तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उबठा पक्षाचे कणकवली तालुका प्रमुख श्री महेश कोळसुलकर व शेर्पे ग्रा.पं सदस्य व शाखाप्रमुख श्री भूषण शेलार हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते दरम्यान खारेपाटण पं.स.मतदार संघात महायुती कडून शिवसेना की भाजप ? नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल हे चित्र लवकरच दोन दिवसात स्पष्ट होईल.


तळेरे पंचायत समिती मतदार संघासाठी भाजप पक्षाकडून हे आहेत इच्छुक
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात समावेश असलेला तळेरे पंचायत समिती मतदार संघ हा महायुती मध्ये भाजप पक्षाकडेच राहिला असून भाजप पक्षाच्या वतीने या मतदार संघात शक्ती केंद्र प्रमुख श्री राजेश जाधव,शिडवणे सरपंच श्री रवींद्र शेट्ये,तळेरे येथील भाजप कार्यकर्ते श्री शैलेश सुर्वे व श्री चिन्मय तळेकर हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून आता पक्षाकडून नेमके कोणाला तिकीट मिळणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाचे यांनी केले नेतृत्व…
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचा जिल्हा परिषद मतदार संघ असून या मतदार संघात मागील ३० वर्षात या कार्यकर्त्यांनी निवडून येऊन मतदार संघाचे नेतृत्व केलेले आहे.यामध्ये कै.श्री पुरुषोत्तम उर्फ बबन शेठ धुमाळे(काँग्रेस),सौ वंदना खटावकर(शिवसेना),कै.बाळा वळंजू (राणे समर्थक),श्रीम.रत्नप्रभा वळंजू (भाजप)श्री रवींद्र उर्फ बाळा जठार (भाजप)मात्र या निवडणुकीत हा मतदार संघ ओ बी सी महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे माजी जि.प.सदस्य माजी बांधकाम व वित्त सभापती श्री रवींद्र जठार यांची संधी हुकली आहे.


शिवसेना उबाठा पक्षाकडून सावध भूमिका,मात्र शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार
दरम्यान खारेपाटण जिल्हा मतदार संघात पारंपरिक विरोधी पक्ष असलेला शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या सावध भूमिका घेण्यात आली असून कणकवली शहर विकास आघाडीचा फॉर्म्युला खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात बिनविरोध निवडीला छेद देत शिवसेना उबाठा पक्ष शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असून दुरंगी किंवा तिरंगी लढतीने निवडणुकीत रंगत आणू शकतो.?


error: Content is protected !!