बॅ. नाथ पै यांच्या ५५व्या स्मृतिदिनानिमित्त सेवा दलामार्फत गोपुरीत आयोजित चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली (प्रतिनिधी) : देशातील जल, जंगल आणि जमीन ही सार्वजनिक संपत्ती राज्यकर्त्यांकडून उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. हीच स्थिती कायम राहिली तर देशात लोकशाहीऐवजी उद्योगपतींची राजवट प्रस्थापित होईल. ही राजवट परकीय किंवा ब्रिटीश सत्तेपेक्षाही अधिक हुकूमशाही व जुलमी असेल, असा इशारा विचारवंत आनंद शितोळे यांनी दिला. ही परिस्थिती ओढवू नये यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने जल, जंगल व जमीन वाचविण्यासाठी संघर्ष उभारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. संसदसपटू बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त गोपुरी आश्रम येथे राष्ट्रसेवा दल व गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल, जंगल, जमीन – काल, आज, उद्या’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर, नितीन वाळके, राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ, सुहास ठाकूर-देसाई, अॅड. प्रवीण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. शितोळे पुढे म्हणाले की, सध्याची सरकारे ही शेतकरी किंवा सामान्य जनतेपेक्षा ग्राहककेंद्री धोरणे राबवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता नाही. शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकावर जीएसटी लादण्यात आल्याने शेती करणे अधिक खर्चिक व अवघड बनले आहे. एकीकडे उद्योगपतींना करसवलती दिल्या जातात, मात्र शेतकऱ्यांना कोणतीही सवलत दिली जात नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पहिल्या पिढीने प्रचंड कष्टातून उभे केलेले मूल्य दुसरी पिढी पुढे नेत असते; मात्र तिसरी पिढी बेफिकीरपणे वागत असल्याने कुटुंब, समाज आणि देशाचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्यांचे कार्य आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचलेले नाही. हे इतिहासाचे भान निर्माण करण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे त्यांनी सांगितले. देशात कट्टरवादी राजकारणाची पायाभरणी अधिक मजबूत होत चालली असून ही लोकशाहीसाठी गंभीर धोक्याची बाब आहे. लोकशाहीचा पाया अधिक बळकट करून कट्टरतेला खतपाणी घालणाऱ्यांचे डाव कायदेशीर मार्गाने हाणून पाडले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. विकासाच्या नावाखाली रोजगारनिर्मितीचे स्वप्न दाखवले जात असले तरी हे केवळ गाजर असल्याचा आरोप करत युवा पिढीने या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

देशातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी पाल्यांना राष्ट्र सेवा दलाशी जोडण्याची गरज असल्याचे मत आनंद शितोळे यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.













