वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सोमवारी चौथ्या दिवशी सुद्धा एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही मात्र जिल्हा परिषदेसाठी चौदा तर पंचायत समिती साठी 35 अशी एकूण 49 अर्जांची विक्रमी विक्री झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 76 जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या 20, 21 जानेवारीला अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे.
वैभववाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदार संघ असून या मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाकडे उमेदवारी मागणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या असून यापैकी कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विशेषत: कोळपे जिल्हा परिषद ही सर्वसाधारण असल्यामुळे या मतदारसंघातून भाजपाकडून दिग्गज उमेदवारांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार निश्चित करणे पक्षश्रेष्ठींसाठी सुद्धा डोकेदुखी करणार आहे. तीच अवस्था पंचायत समिती खांबळे या मतदारसंघाचे आहे. या मतदारसंघातही दिग्गजांकडून उमेदवारी मागितली आहे यातून उमेदवारीसाठी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औसूक्याचे ठरले आहे.










