कणकवली–बिडवाडी मार्गावर दुचाकी अपघात; २० वर्षीय युवकाचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली–बिडवाडी मार्गावर आज सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मूळ विजापूरचा रहिवासी असलेला व सध्या जामसंडे येथे वास्तव्यास असलेला सुनील मल्हारी भिसे हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान दुपारी त्याने प्राण सोडले.

आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास जामसंडे येथील अरूण शेंडगे (वय २३) व सुनील भिसे हे दुचाकीवरून जामसंडेहून कणकवलीकडे येत होते. साळशी–बिडवाडी मार्गावरील बिडवाडी हायस्कूलजवळील तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या एस.टी. बसला वाट देताना दुचाकीचा तोल गेला आणि दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात मागे बसलेल्या सुनील भिसे याच्या डोक्याला गंभीर मार बसला.

घटनेच्या वेळी बिडवाडी हायस्कूल स्टॉपवर एस.टी. बस थांबवत असलेले चालक बाबाजी गणपत राणे (रा. भिरवंडे) यांच्या लक्षात बसच्या आरशातून दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडल्याचे आले. त्यांनी तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच स्थानिक नागरिकांनीही तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात दुचाकी चालक अरूण शेंडगे याला किरकोळ दुखापत झाली. मात्र गंभीर जखमी असलेल्या सुनील भिसे याच्यावर उपचार सुरू असताना दुपारी सुमारे एक वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!