प्राचीन लेणी अभ्यासक प्रफुल्ल पुरळकर यांचा कणकवली महाविद्यालयाच्या वतीने सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व प्राचीन बौद्ध लेणी अभ्यासक प्रफुल्ल पुरळकर यांनी आजपर्यंत १०० पेक्षा अधिक बौद्ध लेणी व स्तूप यांना भेटी देऊन त्याचा अभ्यास केला आहे. त्यांच्या या चळवळीची दखल घेऊन त्यांचा कणकवली कॉलेज येथे आयोजित अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या ३३व्या राष्ट्रीय अधिवेशनात साहित्यिक व लेखक प्रा.सोमनाथ कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे अधिवेशन दि.१६ व १७ जानेवारी, २०२६ रोजी कणकवली कॉलेज येथे संपन्न झाले. या परिषदेमध्ये कणकवली कॉलेज मार्फत बौद्ध स्तूप लेणी अभ्यासक प्रफुल्ल पुरळकर यांचा प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांच्या हस्ते लेणी चळवळीतील योगदानाबद्दल पुष्पगुच्छ व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ‘राजापूर तालुक्यातील अज्ञात लेणी व बौद्ध स्तूप’ या त्यांच्या पहिल्या शोध निबंधाचे वाचनदेखील या परिषदेमध्ये करण्यात आले. तसेच त्यांचा हा लेख ३३व्या शोध निबंधमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

बौद्ध लेणी स्तूप अभ्यासक प्रफुल्ल पुरळकर हे जून २०१८ पासून प्राचीन लेणी हा विषय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असून त्याचा अभ्यास करत आहेत. आजपर्यंत त्यांनी १०२ लेण्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या असून त्यांचे अनेक लेण्यांचे लेख विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहेत. तसेच जवळपास १००पेक्षा अधिक लेण्यांच्या फोटो अल्बमच्या pdf त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या आहेत.

‘राजापूर तालुक्यातील अज्ञात लेणी व बौद्ध स्तूप’ या त्यांच्या पहिल्या शोध निबंधासाठी त्यांना रोहित भोसले व प्रितेश मांजलकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच प्रा. उत्तम भगत, डॉ. सिद्धार्थ कदम, सागर नरडवे, महादेव जाधव, अजित मंदा, अजित धामापूरकर, विजय कदम यांच्या दान पारमीतेमुळे मला हा शोध निबंध प्रत्यक्ष कणकवली येथे इतिहास परिषदेमध्ये सादर करता आला, असे देखील प्रफुल्ल पुरळकर यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!