नितेश राणेंना राम राम… गोट्या सावंतांना सलाम

भाजपा पदाधिकारी संतोष कानडेंच्या स्टेटस ने सिंधुदुर्गात खळबळ

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडील उमेदवारी निश्चिती अंतिम टप्प्यात पोहोचलेली असताना, कणकवली भाजपातील माजी तालुकाध्यक्ष, वृद्ध कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष तसेच राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संतोष उर्फ बुवा कानडे यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. श्री. कानडे यांनी आपल्या स्टेटसमध्ये “नितेश राणेंना रामराम, गोट्या सावंतांना सलाम!” असा स्पष्ट आशय व्यक्त करत पक्षांतर्गत असंतोष उघडपणे मांडला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, पक्षात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

कानडे हे कासार्डे मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचंड इच्छुक होते. त्यांना उमेदवारी बाबत पक्षामार्फत शब्दही देण्यात आला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या जागेवर कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी हा स्टेटस ठेवल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. दरम्यान, आपल्या स्टेटसमध्ये गोट्या सावंत यांना सलाम करताना, कणकवली तालुक्यातील भाजपाच्या तिकीट वाटपात सावंत यांना प्राधान्य देण्यात आल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख कानडे यांनी केल्याचे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे.

या एकाच स्टेटसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भाजपातील अंतर्गत घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

error: Content is protected !!