कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल आणि जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशाला कळसुली येथे पारंपरिक हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रेरणा मांजरेकर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी अश्विनी यशवंत सुतार विराजमान होत्या. या कार्यक्रमाला कामिनी कृष्णा दळवी, संजना संजय सावळ, राधिका आनंद सावंत, सुहासिनी राजा घुगे, कोमल राऊत, रसिका रवींद्र सावंत, सारिका सचिन कदम, मानसी मंगेश दळवी, श्वेता श्रीकृष्ण दळवी, प्रियांका पंढरी देसाई परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर प्रास्ताविक मैथिली दळवी यांनी केले. त्यांनी हळदीकुंकू समारंभामागील सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करत महिलांमधील एकोपा आणि परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख पाहुण्या प्रेरणा मांजरेकर शिक्षण विस्तार अधिकारी कणकवली यांनी आपल्या भाषणात आरोग्य, संस्कार आणि शिक्षण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मुलींना योग्य शिक्षण, सुदृढ आरोग्य व चांगले संस्कार मिळाल्यास त्या स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान देऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात अश्विनी यशवंत सुतार यांनी स्त्रियांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे आवाहन केले. महिलांचे आरोग्य सुदृढ राहिल्यास कुटुंब व समाज सुदृढ राहतो, असे त्यांनी सांगून या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर व आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनाची धुरा चैत्रा चंद्रकांत चव्हाण यांनी समर्थपणे पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, पर्यवेक्षक सावळ एस. के. सांस्कृतिक विभाग प्रमुख अमर पवार, तसेच सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शालेय मंत्रिमंडळातील मुलांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व हातांचे ऋण यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मुली व माता-भगिनींसाठी मूल्याधिष्ठित व मनोरंजनपर खेळांचे आयोजन करण्यात आले.
मुलींच्या गटात प्रथम क्रमांक कुमारी मनस्वी मारुती ठाकूर, द्वितीय क्रमांक कुमारी लावण्या ठाकर व तृतीय क्रमांक कुमारी समीक्षा राणे यांनी पटकावला. माता-भगिनींच्या गटात प्रथम क्रमांक श्वेता श्रीकृष्ण दळवी, द्वितीय क्रमांक रश्मी रामचंद्र गुरव व तृतीय क्रमांक सारिका सचिन कदम यांनी मिळवला. विजेत्यांना कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारंपरिक रीतिरिवाज, स्नेह व आपुलकीच्या वातावरणात हा हळदीकुंकू समारंभ यशस्वीपणे पार पडला.












