चाकरमान्यांच्या एकजुटीचा यल्गार

विनाशकारी रिफायनरी विरोधात जोरदार निदर्शने

मुंबई (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी विरोधी तिव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. भारतीय लोकसत्ताक संघटना, भीम आर्मी, कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा आदी संघटनांच्या माध्यमातून कोकणातील चाकरमान्यांनी दादर पुर्वेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्पा विरोधात जोरदार निदर्शने केली. हा लढा कोणत्या जाती धर्माचा नसून, रिफायनरी विरोधी लढ्यात आम्ही कोकणवाशी एक आहोत, आम्ही भारतीय असून नाणार प्रमाणेच बारसू येथील प्रकल्प आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी घोषणातून चाकरमान्यांची कोकणाविषयी असलेली आत्मियता, जिव्हाळा दिसून येत होता. निदर्शकांची उपस्थिती, त्यानंतर आयोजित करण्यात आलेली बैठक व विविध सामाजिक संघटनांचा मिळत असलेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता, विनाशकारी रिफायनरी विरोधी लढा अधिक व्यापक होणार असल्याचे दिसून येत असून, १ मे महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकात अभिवादन करुन आझाद मैदानात त्याची व्याप्ती दिसून येईल. कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू व परिसरातील गावांमध्ये जगातील सर्वात मोठी सहा कोटी टनांची रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात घाट घातला जात आहे. त्या विरोधात स्थानिकांनी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी २८ एप्रिल २०२३ रोजी मुंबईत दादर पुर्वेला एकवटलेल्या चाकरमान्यांनी आपल्या एकसंघ शक्तीचे दर्शन घडवून दिले. रिफायनरी विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रोजगाराच्या नावाखाली विनाशकारी प्रकल्पाव्दारे वैभवशाली निसर्ग संपन्न कोकणाचे वाळवंट न करता, निसर्गाचा ऱ्हास न करता रिफायनरी प्रकल्प कोकणातून हद्दपार करुन, त्या ऐवजी वेदांता फॉक्सकॉन, रेल्वे वर्कशॉप, स्वाफ्टवेअर इंडस्ट्री, आयटी अशा पर्यावरण पुरक प्रकल्पांची कोकणात निर्मिती करावी अशी सर्वांचीच मागणी होती. सदर आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनात भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष अमोलकुमार बोधिराज, कुणबी महिला संघाच्या सचिव अन् भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या उपाध्यक्षा दिपीका आंग्रे, कुणबी युवा संघाचे अध्यक्ष महादेव कांबळे, भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे, जेष्ठ समाजसेवक सुमेध जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नाईक, अनिल कदम, वैभव मोहिते, मनिष जाधव, दिलीप शेडेकर, पिलाजी कांबळे, शोभा चिंचवलकर, किरण गमरे, गुणवंत कांबळे, रुपाली खळे, अंकिता मोरे. योगेश कांबळे, वैशाली कदम, मयुरेश जंगम, अमित खैरे, संदिप कांबळे, मनिष कदम, अभिषेक कासे यांच्यासह शेकडो कोकणवाशी चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!