मुहूर्त ठरला… अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

ब्युरो न्यूज: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्वीट करून दिली. राम मंदिराचे गर्भगृहाचे खांब १४ फुटापर्यंत तयार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. याच दिवसापासून भक्तांना मंदिरात पूजा-अर्चाही सुरु करता येणार आहे. मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये तर २०२५ पर्यंत मंदिर पूर्णपणे आकाराला येईल. जानेवारी २०२४ मध्ये मंदिरात पूजाअर्चा सुरू होऊ शकेल. मंदिराच्या उभारणीवर ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकूण खर्च १८०० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. माध्यमातील वृत्तानुसार, राम मंदिरात नवीन आणि जुन्या अशा दोन्ही राम मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची योजना आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे थेट रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करतील. त्या दिवशी मूर्तीच्या ललाटावर ५ मिनिटे किरणे राहतील. त्याला ‘सूर्य तिलक’ असे म्हटले आहे. रामलल्लाच्या मूर्तीसाठी अनेक ठिकाणांहून शिळा आणण्यात आल्या आहेत. यात नेपाळच्या गंडकी नदीतून आणलेल्या शालिग्राम शिळांचा समावेश आहे. मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येणारी मूर्ती ही भगवान श्रीरामाच्या बालपणीची असेल. ही मूर्ती प्राचीन ग्रंथात नमूद शास्त्रीय पद्धतीनुसार साकारली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!