नाटळ जि. प. मधील उबाठाचे उमेदवार उत्तम लोके, लोकेंच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या; पोलीस संरक्षणाचा खर्चही मी देतो

जि. प. निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर उत्तम लोके स्वतःच स्वतःला इजा पोचवून सहानुभूती मिळविण्याची शक्यता

भाजपाचे उमेदवार संदेश सावंत यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठाचे उमेदवार उत्तम लोके व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे. वाटल्यास त्या पोलीस संरक्षणाचा खर्च मी देतो. माझ्या विरोधी असलेले उमेदवार उत्तम लोके यांनी माझी पत्नी आणि माझ्याविरोधात खोटे खोडसाळ प्रतिज्ञापत्र केले असून जिल्हा परिषद निवडणुक मतदानाच्या पार्श्वभूमीवर उत्तम लोके हे स्वतःच स्वतःला इजा पोचवून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे उत्तम लोके व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे असे लेखी निवेदन नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संदेश सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

निवेदनात संदेश सावंत यांनी म्हटले आहे की, माझ्या विरोधात जिल्हा परिषद निवडणूक लढवत असलेले उबाठा गटाचे उमेदवार उत्तम लोके हे नामनिर्देशन दाखल केल्यापासून माझ्यावर खोटे खोडसाळ आरोप करत आहेत. माझी पत्नी व माझ्याविरोधात खोडसाळ प्रतिज्ञापत्र करून जनमाणसांत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न लोके करत आहेत. मी 35 वर्षे राजकारणात असून विविध विकासकामे केलेली आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन हरकुळ आणि नाटळ विभागातील उबाठाच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासकामांच्या शैलीमुळे नाटळ जि. प. साठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन मागे घेतले आहे. त्यामुळे उत्तम लोके यांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोके यांच्या प्रतिज्ञापत्रातील कोणताही आरोप किंवा गुन्हा मी केलेला नाही. उत्तम लोके यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटल्यानुसार कोणतीही घटना त्रयस्थामार्फत घडल्यास किंवा माझ्या राजकीय विरोधकांनी घडविल्यास अथवा उत्तम लोके यांनी स्वतःहून अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत घडवून आणल्यास त्याचा परिणाम उद्या 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानावर होणार असूनत्यामुळे माझी समाजात खोडसाळपणे बदनामी होऊ शकते. उत्तम लोके यांना माझ्यापासून अथवा भाजपा कार्यकर्त्यांकडून कोणताही धोका नाही. त्यामुळे उत्तम लोके आणि त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी लेखी निवेदनातून संदेश सावंत यांनी केली आहे.

error: Content is protected !!