अमृतमहोत्सवी भारतात विद्यामंदिरांची दुर्दशा

तरंडळे प्रशालेचे मोडकळीस आलेले छप्पर ठरतंय विद्यार्थ्यांना धोकादायक

२६ जानेवारीपर्यंत दुरुस्तीचा निर्णय न झाल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर मोडकळीस आल्याने धोकादायक बनले आहे. अनेकवेळा त्याबाबत शिक्षण विभाग तसेच अन्य अधिकाऱ्याना निवेदने देऊनही कोणीही दखल घेतलेली नाही. २६ जानेवारीपर्यंत या शाळेबाबतचा निर्णय न घेतल्यास २७ जानेवारी पासून शाळेत मुलांना पाठविले जाणार नाही. तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून शाळेच्या परिसरात काळे झेंडे लावले जातील. असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमाकांत देवलकर, ग्रामस्थ अनंत सावंत, अमित सावंत यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर मोडकळीस आले आहे. या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गात ६१ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळेची दुरुस्ती करून छप्पर लोखंडी बनवावे यासाठी सन २०१६ पासून आतापर्यंत अनेक वेळा शिक्षण विभाग तसेच प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी संबधित शाळेची पाहणी केली आहे. तसेच दुरुस्तीची आवश्यकता असल्याचा शेरा मारला आहे. मात्र, त्यानंतर कोणीही त्याची दखल घेतलेली नाही. एकाच खोलीत दोन, तीन इयत्तेतील मुलांना एकत्र बसविले जात आहेत. काही मुले कंटाळून कणकवली येथे दुसऱ्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आम्ही गावातील ग्रामस्थ व पालकानी २७ जानेवारी पासून शाळेत मुले न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!