खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी ॲड. किशोर वरकला पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लावू नये यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील 1 लाख रुपये खंडणी घेतल्याच्या गुन्ह्यातील आरोपी ॲड. किशोर वरक याला कुडाळ न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश शिरसाट याला मोक्का लावणार असून आपण सरकारी वकिलांसोबत काम करणार आहे असे सांगून मोक्का न लावण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली व त्यातील 1 लाख रुपये खंडणी रक्कम घेतली अशी फिर्याद सिद्धी शिरसाट यांनी ॲड. किशोर वरक विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन साठी आरोपी ॲड. किशोर वरक याने सेशन कोर्ट, हायकोर्ट ते अगदी सुप्रीम कोर्टाचेही दरवाजे ठोठावले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने आरोपी किशोर वरकला 15 दिवसांत शरण जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुडाळ न्यायालयात हजर झालेल्या आरोपी किशोर वरक याला कायदेशीर बाबी पूर्ण करून कुडाळ पोलिसांनी 13 फेब्रुवारी रोजी अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी आपले म्हणणे सरकारी वकिलार्फत मांडून 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली.

आरोपी किशोर वरक याने स्वीकारलेली 1 लाख रुपयांची खंडणीची रक्कम हस्तगत करणे, त्याचा मोबाईल जप्त करणे, आरोपीच्या आवाजाचा नमुना घेणे, या गुन्ह्यात अन्य कोणी सामील असल्यास तपास करणे, गुन्हा घडल्यापासून आरोपी किशोर वरक 3 महिने फरार असताना तो कोठे राहिला याचा तपास करणे आदी मुद्दे मांडत 7 दिवस पोलीस कोठडी मागण्यात आली. कुडाळ न्यायालयाने आरोपी किशोर वरक याला सोमवार 16 फेब्रुवारी पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

error: Content is protected !!