स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी आत्मविश्वास आणि सातत्य आवश्यक – जयप्रकाश परब

फोंडाघाट महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक संजय आग्रे, संदेश सावंत, रंजन नेरुरकर, अंतर्गत हिशोब तपासणी सुंदर पारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे इ. मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे जयप्रकाश परब यांनी आपल्या खडतर जीवनप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना संघर्ष, चिकाटी आणि सातत्य या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. एमपीएससी-यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वास अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि नवी उमेद निर्माण झाली. यावेळी त्यांनी महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचा संदेश देत समाजातील विविध गैरसमजुती दूर करण्याचे आवाहन केले. वैज्ञानिक व सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

संस्थेचे ज्येष्ठ संचालक संजय आग्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगशील वृत्ती जोपासणे अत्यावश्यक आहे. ज्यांना उद्योग-व्यवसायाची आवड आहे त्यांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगारनिर्माते बनण्याचा ध्यास घ्यावा. स्थानिक पातळीवरील संसाधनांचा योग्य वापर करून ग्रामीण भागातही यशस्वी उद्योग उभारता येतात, यावर त्यांनी भर दिला. महाविद्यालयाने दिलेल्या शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा आणि माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे, असे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रंथालय सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतो; त्या गुणांची ओळख करून त्याचा विकास करणे हेच यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात महेश सावंत यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, आज मिळालेला सन्मान हा तुमच्या मेहनतीचा आणि पालक-शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा परिणाम आहे. यशस्वी होण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम या मूल्यांची जोपासना आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा कटाक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालय व गावाचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिया मेस्त्री, प्रमुख पाहुण्यांची ओळख कोमल मेस्त्री हिने करून दिली. सूत्रसंचालन नीता धुरी व रिया मेस्त्री या विद्यार्थिनींनी केले. महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल क्रीडा विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी सादर केला. पारितोषिक वितरण प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश कामत यांनी केले. त्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिमरन तांबे हिच्या “ओझं” या एकपात्री नाटकाने सभागृहात भावनिक वातावरण निर्माण केले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले. चेतन डोंगरे याच्या विनोदी नाटिकेने मात्र प्रेक्षकांना पोट धरून हसवले. दीक्षा जाधव व सहकाऱ्यांचे पारंपरिक कोळी नृत्य, मानसी बाणे हिच्या लावण्या तसेच रिया व प्रिया मेस्त्री यांच्या जोशपूर्ण नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाला रंगत आणत प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. यावेळी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून तसेच उपस्थित विद्यार्थ्यांकडून रोख पारितोषिके देण्यात आली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!