नाधवड्यातील सचिन मिस्त्रीची अनोखी कलाकृती
वैभववाडी (प्रतिनिधी) : अत्यंत सूक्ष्म आणि देखण्या पद्धतीने साक्षात भगवान शंकर महादेवाचे चित्र अवघ्या चार सेंटीमीटरच्या बेलाच्या पानावर रेखाटत नाधवडे (महादेववाडी) येथील सचिन मिस्त्री याने आपल्या कलेची झलक दाखवून दिली आहे. त्याच्या या अनोख्या आणि आकर्षक कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन मिस्त्री यांनी बेलाच्या पानावर ॲक्रेलिक रंगांच्या सहाय्याने अत्यंत बारकाईने हे चित्र साकारले आहे. या चित्रासाठी त्यांना तब्बल दहा तास मेहनत घ्यावी लागली. इतक्या छोट्या आकाराच्या पानावर भगवान शंकरांचे भावपूर्ण आणि जिवंत भासणारे चित्र रेखाटणे ही मोठीच कौशल्याची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे सचिन सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून त्याने चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र, अंगी असलेल्या उपजत कलेच्या जोरावर तो सातत्याने विविध प्रयोग करत आहे. सूक्ष्म वस्तूंवर चित्र रेखाटण्याचा त्याला विशेष छंद आहे. यापूर्वीही त्याने सुपारीवर भगवान विठ्ठलाचे चित्र रेखाटून लक्ष वेधले होते. आता बेलपानावरील शंकराचे चित्र पाहून गावकऱ्यांसह कला रसिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सचिनच्या या कल्पक आणि श्रद्धायुक्त कलाकृतीमुळे परिसरात त्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.












