फोंडाघाट महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक करताना डॉ. बालाजी सुरवसे यांनी छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी, धैर्य आणि संघटनकौशल्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श ठेवून जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले.
आपल्या भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी सांगितले की, छ. शिवाजी महाराजांना त्यांच्या आई जिजाबाई यांनी बालपणापासून रामायण-महाभारतातील कथा सांगून धर्म, शौर्य आणि न्यायाची शिकवण दिली. तसेच त्यांचे मार्गदर्शक दादोजी कोंडदेव यांनी शस्त्रविद्या व प्रशासनकलेचे शिक्षण दिले.त्या काळात देशावर मोगल व आदिलशाही सत्तेचे वर्चस्व असताना परकीय सत्तेविरुद्ध स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेत महाराजांनी तरुण वयातच तोरणा किल्ला व राजगड यांसारखे किल्ले जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली. छ. शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते कुशल प्रशासकही होते. अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून त्यांनी प्रशासनाची भक्कम रचना उभी केली. शेतकऱ्यांचे संरक्षण, स्त्रियांना सन्मान आणि सर्व धर्मांना समान वागणूक हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या जीवनातून स्वाभिमान, धैर्य, शिस्त आणि लोककल्याण यांचे मूल्य शिकण्यास मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












