नगरपंचायत कणकवलीच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांची आरोग्य विभागाविरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार

कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत कणकवलीच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत नगरसेविका मनस्वी मिथुन ठाणेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. कार्यालयीन वेळेत आरोग्य विभागातील कर्मचारी खाजगी मालमत्तेत साफसफाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी कणकवली शहरातील हर्णेआळी परिसरात नगरपंचायतीचे कर्मचारी एका खाजगी मालमत्तेमध्ये साफसफाई करताना आढळून आल्याचे ठाणेकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या संदर्भातील व्हिडिओ पुरावा आपल्या जवळ असल्याचे सांगत तो संबंधित अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नगरपंचायतीचे कर्मचारी खाजगी मालमत्तेत कार्यालयीन वेळेत काम करण्यासाठी गेले होते का? त्यांना कार्यालयाची परवानगी होती का? तसेच हे कर्मचारी कोणाच्या सांगण्यावरून पाठविण्यात आले, याचा खुलासा करावा, अशी मागणी ठाणेकर यांनी केली आहे.

यासोबतच १४ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत नगरपंचायतीचा जेसीबी हर्णेआळी परिसरात कोणत्या कामासाठी पाठविण्यात आला होता, याचीही चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा वापर खाजगी कामांसाठी होऊ नये, तसेच अशा प्रकारांमुळे नगरपंचायतीचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून सर्व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

error: Content is protected !!