श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रजनी ठाकूर, भावना मुणगेकर, प्रसाद रेडकर, मिथिला नेरुरकर आणि कै सुधाकर आचरेकर प्रायोजित जिल्हा स्तरीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धा शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. सदर स्पर्धेत अनुराधा अ. आचरेकर (आचरा) प्रथम क्रमांक, नारायण धुरी (मालवण) मालवण व्दितीय क्रमांक, मधुरा माणगांवकर (आचरा) तृतीय क्रमांक, श्रुती गोगटे (वायंगणी) उत्तेजनार्थ १, श्रेया मेस्त्री (आचरा) उत्तेजनार्थ २ क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेदरम्यान आचरे गावातील शालांत परीक्षेत मराठी विषयात पहिल्या आलेल्या पाच विद्यार्थ्यांना कै. दादा ठाकूर आचरा पारवाडी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रसाद ठाकूर यांच्या देणगीतून संस्थेचे आजीव सदस्यत्व बहाल करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी केले तर उपस्थितांना व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व याबाबत जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी व ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे सूत्रसंचलन संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी तर सांस्कृतिक समिती सदस्या भावना मुणगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण रामचंद्र कुबल व मंदार सांबारी यांनी केले. स्पर्धेत दहा कवींनी सहभाग दर्शविला कार्यक्रमास संस्थेचे सर्व कार्यकारिणी व सांस्कृतिक समिती सदस्य उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी, कार्यवाह अर्जुन उर्फ दादा बापार्डेकर, सहाय्यक ग्रंथपाल महेश बापर्डेकर, लिपिक समृद्धी मेस्त्री – बापर्डेकर, शिपाई स्वप्नील चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.














