संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर चे आयोजन
चौके (प्रतिनिधी) : वराडकर हायस्कुल कट्टाचे माजी मुख्याध्यापक, ग्रामपंचायत खरारे पेंडूरचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते दिवंगत कै.संजय नाईक यांचा 8 मार्च हा जन्मदिवस पेंडूर, तळीवाडी येथे विविध समाजिक, शैक्षणिक उपक्रमानी साजरा करण्यात आला.
यानिमित्त संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूरच्या वतीने सकाळी संजय नाईक स्मृती रन च्या माध्यमातून 5 किलोमीटर मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याचबरोबर सायंकाळी कै. संजय नाईक सर यांच्या निवासस्थानी संजय नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील 8 गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले तसेच गावातील गुणवंत विद्यार्थी तसेच प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच यावेळी बॅ. नाथ पै. सेवागण कट्टा यांच्या वतीने संजय नाईक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नांदोस येथील उपक्रमशील शिक्षक बाळकृष्ण नांदोसकर यांना देण्यात आला. यावेळी नांदोसकर सर यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर अध्यक्ष महेश नाईक, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, संजय नाईक यांच्या पत्नी श्रावणी नाईक, बॅ. नाथ पै सेवांगणचे दीपक भोगटे, बापू तळवडेकर, रविंद्र शिरसाठ, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालक बापू वराडकर, पेंडूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊ सावंत पटेल, कस्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम, पेंडूर सोसायटी चेअरमन दीपा सावंत, प्रगतशील शेतकरी दीपक गावडे, लेखिका संध्या तांबे, समीर चांदरकर, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, सोमनाथ परब, सतीश वाईरकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, संजय पेंडुरकर, संदेश नाईक, गौरव नाईक, अभिजीत जाधव, निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांनी संजय नाईक सर यांच्या स्मृतींना उजाळा दिला व नाईक सर यांच्या जाण्याने पेंडूर गावासह कट्टा पंचक्रोशीची फार मोठी हानी झाली असून त्यांच्या सारखे सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करून नाईक सरांनी सुरु केलेले समाजसेवेचे कार्य संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूरच्या माध्यमातून श्री. महेश नाईक आणि कुटुंबीय व सरांचा मित्र परिवार यांनी सरांच्या पश्चातही सुरु ठेवले आहे त्याबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले.
तर संजय नाईक स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळकृष्ण नांदोसकर यांनी आभार व्यक्त करताना अशा भावना व्यक्त केल्या कीं स्वतः आदर्शवत आणि उपक्रमशील असलेल्या संजय नाईक सरांच्या स्मृती प्रित्यर्थ मला उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळतोय हीं माझ्यासाठी खूपचं गौरवाची बाब आहे असे मी समजतो. नाईक सरांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असे मतही नांदोसकर सर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी संजय नाईक सरांचे भाऊ तसेच संजय नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश नाईक यांनी संजय नाईक सर यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचीहीं हानी झाल्याची भावना व्यक्त करून संजय नाईक सरांचा सामाजिक कार्याचा वसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अव्याहत सुरु ठेवला जाईल अशी ग्वाही दिली आणि सरांचे सर्व हितचिंतक, मित्रपरिवार आणि प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.











