मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, येथे होणार बैठक
पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह कोकणातले मंत्री,आमदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे दिले होते मोर्चाला आश्वासन
आंबा, काजू शेतकऱ्यांसाठी सरकार ॲक्शन मोडवर
कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १७ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजता मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला सामोरे जात त्यांच्या प्रश्नांची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मंत्री, राज्यमंत्री, कोकणातील आमदार-खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री योगेश कदम (गृह), कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार दीपक केसरकर, भास्कर जाधव, खासदार सुनील तटकरे, आमदार निलेश राणे, महेंद्र दळवी, किरण सामंत, शेखर निकम, सुनील प्रभू, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह कोकणातील अनेक आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय सचिव स्तरावरील वरिष्ठ अधिकारी, कोकणातील सर्व जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित अधिकारीही बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंबा व काजू पिकांच्या नुकसानीबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा होऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या सूचना व निर्णय अपेक्षित आहेत.












