केंद्रप्रमुख परीक्षेत गुणवत्ताधारक शिक्षकांना टीईटी अट शिथिल करा

प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये केंद्रप्रमुख पदासाठी शासनामार्फत विशेष परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल १३ मार्च रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. ज्यावेळी सदर परीक्षेचे फॉर्म भरले त्यावेळी टीईटी बाबत कोणतीही शिफारस नव्हती. ही परीक्षा टीईटी झालेले व न झालेले असे सर्व पात्र शिक्षकांनी दिली. सदर परीक्षेचा अभ्यास करून अनेक शिक्षकांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवलेले आहे. मात्र टीईटी उत्तीर्ण नसल्याने अशा शिक्षकांची केंद्रप्रमुख पदाची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीवर आगाऊ नियुक्ती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग ने केली आहे.

सद्या टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची माहिती लिंकद्वारे परीक्षा परीषदेने मागवली असल्याने केंद्रप्रमुख परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊनही केवळ सद्या टीईटी उत्तीर्ण नसल्याने अशा शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. शासनाच्या पूर्वीच्या धोरणाप्रमाणे ज्या शिक्षकांनी केंद्रप्रमुख परीक्षेत गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केलेले आहे व आपली या पदाची पात्रता सिद्ध केलेली आहे. अशा शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यात यावी. तसेच पुढील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कालावधीमध्ये टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घालून त्यांना नेमणूक द्यावी. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार सदर शिक्षकांना आपण योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्याद्वारे शासन व प्रशासन स्तरावर करण्यात आली आहे.

error: Content is protected !!