बारसुत उद्धव ठाकरेंच्या सभेत दगाफटका करण्याचा कट

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचा खळबळजनक दावा

ओरोस (प्रतिनिधी) : बारसू रिफायनरी कोकणातून जाण्यासाठी कोकणशी काडीचा संबंध नसलेली माणसे प्रयत्न करीत आहेत. ६ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेतील गर्दीचा फायदा घेवून भयानक घटना धडविण्याचा कट आखला जात आहे. यासाठी बारसू येथे जिलेटीन टीक्स आणल्या गेल्या आहेत, अशी खळबळजनक माहिती देतानाच भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी याचा पोलिसांनी शोध घ्यावा. आवश्यक माहिती आपण देवू, असे आवाहन केले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून रणकंदन उडालेले असताना प्रकल्प विरोधासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ६ रोजी बारसू येथे येत आहेत. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना या तापलेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी कोकण प्रांताशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती येथे येत आहेत. तेथे साहित्य पुरवीत आहेत. यातीलच एका व्यक्तीने जिलेटीन टीक्स पुरविल्या असल्याचा गंभिर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. मात्र, यामागे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा संबंध नसल्याचे राणे म्हणाले. परंतु यानिमित्त होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून भयानक कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दुर्दैवाने तसा प्रकार घडल्याने नाहक जीव जातील. त्यामुळे याचा पोलिसांनी तत्काळ शोध घ्यावा. यासाठी माझ्याकडे असलेले पुरावे आपण देण्यास तयार आहोत. तसेच याबाबत ५ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सविस्तर माहिती सादर करणार असल्याचे यावेळी राणे यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी जिलेटीन टीक्स सारख्या वस्तू आणल्या जात असतील. तर ते धोकादायक आहे. त्यामुळे आपण जागृत करण्यासाठी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्प गेला तर भविष्यात कोकणात कोणताच प्रकल्प येणार नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. राजकीय नेत्यांनी मैदानात उतरून काम केले पाहिजे, असे यावेळी राणे म्हणाले. तसेच रिफायनरी प्रकल्पाबाबत भूमिका चिघळवण्यासाठी ठाकरे बारसू येथे येत असतील तर आम्हाला समर्थनार्थ मोर्चा काढावा लागेल. आम्हाला समर्थनार्थ दाखवावा लागेल, असे यावेळी राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!