कणकवली (प्रतिनिधी) : कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आशिये सोनगेवाडी परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,रिचा राजन रासम (४३, रा. आशिये सोनगेवाडी) या शहरातील डॉ. समृद्धी नाडकर्णी यांच्या फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास काम संपवून त्या आपल्या घराकडे जात होत्या. त्या आपल्या अपार्टमेंटखाली पोहोचल्या असता, मागून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून सुमारे २२ वर्षे वयोगटातील दोन तरुण आले.
चोरट्यांनी रिचा रासम यांना ‘काकी’ अशी हाक मारून थांबवले आणि “येथे काळे सर राहतात का?” अशी विचारणा केली. रासम यांनी माहिती नसल्याचे सांगून पुढे जाण्यास सुरुवात केली. मात्र, एका चोरट्याने पुन्हा हाक मारून त्यांचे लक्ष विचलित केले आणि मागून येऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे ५०,००० रुपये) हिसकावून घेतले.
मंगळसूत्र ओढणारा तरुण पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला होता. चोरी केल्यानंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरून कणकवलीच्या दिशेने पसार झाले. महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. परिसरात रात्रीच्या वेळी अशा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.











