देशाच्या विकासाला गती देण्यासाठी डिजिटल मिडियाची गरज – ना. चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशासन अधिकारी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडियाचे अधिवेशन उत्साहात संपन्न

मिरज (प्रतिनिधी) : वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये डिजिटल माध्यमांचा विस्तार वाढला आहे. देशाच्या विकासाला गतिमान दिशा देण्यासाठी डिजिटल माध्यमाची गरज आहे. अर्थात डिजिटल मिडियात काम करणार्‍यांनी दुतर्फा विचार करून त्याचा योग्य वापर करावा, असे मत महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. अर्थात डिजिटल मिडियाच्या सर्व मागण्या मार्गी लावून पाठबळ देईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया, मुंबई राज्य अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा मिरज संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र सुनिल फुलारी, आ. गोपीचंद पडळकर, आ. विक्रम पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे तसेच जर्नालिस्ट असेसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया राज्य संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे, उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र सुनिल फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशीक, उद्योजक दिलीप कोटीभास्कर, प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ स्वीकृत नगरसेवक – सोलापूर नगरपालिका मनीष केत, भाजपचे प्रदेश प्रवक्ता नगरसेवक नवनाथ बन, ज्येष्ठ वैद्य डॉ. विनोद परमशेट्टी यांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

ना. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, आज ज्या ज्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी विकसीत भारत, समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुरस्कारामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे. तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या जीवनात चांगले काम करा. त्यामुळे समाज सुधारेल. समाज सुधारणीमध्ये आता डिजिटल मिडियाची महत्वाची भूमिका असणार आहे. प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची भूमिका, समस्या मांडणी, काही योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी काम डिजिटल मिडिया करीत आहे.

ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डिजिटल मिडियाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात उपयोग होतो. डिजिटल मिडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. हा कसोटीची काळ आहे. डिजिटल मिडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती गेली तर कोणाचेतरी आयुष्य उध्दवस्त होवू शकतो. डिजिटल मिडियाची जेवढी क्रांती होईल ती गरज सरकारला आहे. डिजिटल मिडिया मोठा करताना काळजीही करावी लागणार आहे. विकसित भारत घडविताना मिडियाच्या माध्यमातून चांगली माहिती दिली पाहिजे.

ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संवेदनशीलता माणुसकी जपले पाहिजे. जेथे चूक आहे ते बोललेच पाहिजे. डिजिटल मिडियामुळे 12 सेकंदात बातमी सर्वत्र जाते. डिजिटल मिडियाची क्रांती 2014 मध्ये झाली. डिजिटल मिडिया हा अत्यंत महत्वाचा बनला आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या महत्वाच्या योजना या लक्षात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला जातो. आकस्मित निधीसाठी फंड दिला जाईल असेही ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संजय भोकरे म्हणाले, डिजिटल मिडियाने संघटित होऊन काम केले पाहिजे. भविष्यात त्यांच्या स्त्रोतांचा वापर टीव्ही मिडियासाठी होऊ शकेल. त्यातून डिजिटल मिडियातील काम करणार्‍यांना आर्थिक सक्षमताही मिळेल. शासनानेही डिजिटल मिडियासाठी पाठबळ द्यावे. डिजिटल मिडियासाठी 2 कोटींचा निधी दिला तर त्याच्या व्याजातून अनेकांना मदत मिळेल, अशी मागणीही ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

यावेळी डिजिटल मिडियातील काही पदाधिकार्‍यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अतिशय नियोजनबध्द कार्यक्रम पार पडला. लातूर, मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड आदी जिल्ह्यातून डिजिटल मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!