आंबोली आजरा फाट्यावर कंटेनर पलटी

जीवितहानी नाही; मात्र कंटेनर चे नुकसान

आंबोली (प्रतिनिधी) : सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावरील आंबोली आजरा फाट्याजवळ काल रात्री एक मोठा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. सांगलीहून वेंगुर्ले-मठच्या दिशेने जात असलेला हा कंटेनर श्री भवन रस्त्यालगत अचानक कलंडला. सुदैवाने या अपघातात कंटेनर चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून तो सुखरूप बचावला आहे. मात्र, या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात घडताच आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष गलोले यांच्यासह स्थानिक पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कंटेनरचा आकार प्रचंड मोठा असल्याने त्याला रस्त्यावरून बाजूला करणे कठीण जात होते. अखेर मदतकार्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब मागविण्यात आला. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नांनंतर कंटेनर बाजूला करण्यात यश आले. यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या अपघाताची रीतसर नोंद आंबोली पोलिसांत करण्यात आली आहे.

error: Content is protected !!