खारेपाटण येथे ऊस शेतकऱ्याच्या शेतात तुटून पडलेली ३३ के व्ही वीज वाहिनी धोकादायक

१५ दिवस झाले तरी वीज मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण व आजूबाजूच्या परिसरात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक सर्व सामान्य नागरिक व शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका हा वीज वहिनींना बसला असून खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी असलेले सुभाष चव्हाण यांच्या उसाच्या शेतात ३३ के व्ही वीज वाहिनी तुटून पडून सलग १४ दिवस होऊन गेले तरी वीज मंडळाकडून तुटलेली ही वीज वाहिनी अद्याप जोडण्यात आली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण येथील वीज केंद्रातून कोंडये राजापूर येथील सब स्टेशन ला गेलेली ३३ के व्ही वीज वाहिनी नुकत्याच झालेल्या वादळात तुटून पडली असून खारेपाटण येथील शेतकरी सुभाष चव्हाण यांच्या उसाच्या शेतात ही वीज वाहिनी तुटून पडली असल्यामुळे त्यांनी वारंवार संबधीत वीज अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन देखील विद्युत पारेषण कंपनीकडून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सुभाष चव्हाण यांनी केला आहे. तर खारेपाटण सिंधुदुर्ग विभाग अधिकाऱ्यांकडून ही वीज वाहिनी कोडये, राजापूर सब स्टेशन अंतर्गत येत असल्याचे सांगितले. तर कोडये, राजापूर सब स्टेशन चे वीज अधिकारी ही वीज वाहिनी सब सेंटर भुईबावडा शी संलग्न असल्याचे सांगतात. त्यामुळे जो तो आपल्यावरच्या जबाबदाऱ्या झटकून दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचे काम करताना अधिकारी दिसत आहे. परिणामी सभाजी नगर, खारेपाटण येथील शेतकरी सुभाष चव्हाण यांच्या उसाच्या शेतात ही वीज वाहिनी गेली असल्यामुळे त्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. तर खारेपाटण येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर स्वनील महादेव गुरव यांच्या घरासमोर महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याला लागून उभे केलेले वीज पोल धोकादायक स्थितीत असून एकाच ठिकाणी ४ एकत्र असलेल्या या विद्युत पोलचा उभ्या असलेल्या तळातील मातीचा भराव जमिनीची धूप होऊन पूर्णतः निघून गेला असून सध्या ही विद्युत पोल तकलाउ स्थितीत उभे आहेत यामुळे कधीही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत स्वप्नील गुरव यांनी ही बाब वीज मंडळ व हायवे प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिली. तरी देखील याकडे संबंधित अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी खारेपाटण मधील विजेशी संबंधित असलेली खारेपाटण मधील कामे विद्युत पारेषण कंपनीने तातडीने करून घ्यावी. व भविष्यात होणारे अपघात टाळावे अशी मागणी खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई यांनी केली आहे.

खारेपाटण येथील शेतकरी सुभाष चव्हाण यांच्या उसाच्या शेतात वीज वाहिनी तुटून पडली आहे. २ तर खारेपाटण हायवे ला धोकादायक स्थितीत उभे असलेले विद्युत पोल दिसत आहेत.

error: Content is protected !!