वैभववाडीत मान्सूनचे दमदार आगमन : तब्बल तासभर कोसळला पाऊस

शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात रविवारी दुपारी मान्सूनचे दमदार आगमन झाले. तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.शनिवारी देखील तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी जवळपास तासभर पाऊस कोसळला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील भुईबावडा व करुळ घाट परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर चिखलमाती आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे घाट मार्गातून वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

मागील वर्षी मे महिन्याच्या अंदाजे 9 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तालुक्यावरील पाणी टंचाईचे संकट टळले होते. मात्र यावर्षी मे महिना संपून 6 जून उजाडला तरी ही पावसाचे आगमन झाले नाही. शेतकरी शेतीची जय्यत तयारी करून आकाशाकडे नजरा लावून बसले होते. अखेर रविवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले. आणि दुपारी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह काही भागांत पावसाचा जोरदार वर्षाव झाला.

तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेती कामांना अधिक गती मिळणार आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम शेतीची तयारी सुरु केली आहे. पुढील चार दिवस पाऊस असाच झाल्यास Branch सर्वच शेतकरी भात पेरणीसह पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात करणार हे निश्चित आहे.

error: Content is protected !!