पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वारगावात सायकल रॅली उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. गावातील विविध मान्यवर, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

रॅलीच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व, वाढते प्रदूषण, वृक्षलागवडीची गरज आणि भावी पिढीसाठी स्वच्छ व हिरवेगार पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घोषणाबाजी करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. गावातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली.

यावेळी वारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच नाना शेटये यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अश्फाक हाजू उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद केसरकर, शालेय व्यवस्थापन समिती शाळा क्रमांक ३ च्या मयुरी गुंड, शाळा क्रमांक १ चे विलास तळेकर, राजाराम बोभाटे, विलास मांजरेकर यांनीही सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका अर्चना तळगावकर यांच्यासह त्रैतुजा जंगले, विश्वनाथ चव्हाण, शिवानी देसाई, अलका मोरे, समिधा शेटये, अंगणवाडी सेविका स्वाती मेस्त्री, मयुरी गुरव तसेच वारगाव क्रमांक ३ येथील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
वारगाव ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावागावांत पोहोचला असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याची ग्वाही दिली.

error: Content is protected !!