बांदा (प्रतिनिधी) : सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून हळद लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळद लागवडीकडे वळून स्वतःचे उत्पन्न वाढवावे आणि स्वावलंबी बनावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांनी केले.
पाडलोस-केणीवाडा येथे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोफत हळद बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. बांदा भाजप मंडळ उपाध्यक्ष ओमकार प्रभू आजगावकर, मळेवाड बूथ अध्यक्ष अमित नाईक, पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, शेतकरी अमोल नाईक, भूषण केणी, एकनाथ नाईक, सूर्यकांत नाईक, राजन नाईक, सरस्वती केणी, मंगल नाईक, प्रतीक्षा नाईक, छाया नाईक, उर्मिला नाईक आदी उपस्थित होते.
अपर्णा सातोसकर म्हणाल्या की, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या हळदीला बाजारपेठेत मोठी मागणी असून शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक नफा मिळवून देण्याची क्षमता या पिकात आहे. ज्या शेतकऱ्यांना हळद लागवड करायची आहे, त्यांना आवश्यक तेवढे बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हावा, हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत हळद लागवडीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या पिकांविषयी उत्सुकता निर्माण झाली असून सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यासही चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कमी खर्चात जास्त उत्पन्न
हळद हे कमी खर्चात आणि तुलनेने कमी जोखमीचे पीक मानले जाते. योग्य नियोजन, सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होऊ शकते, असे ओमकार प्रभूआजगावकर यांनी सांगितले.












