कै. न्हानू सावंत व कै. सुहासिनी सावंत यांच्या स्मरणार्थ देवदर्शन यात्रेचे आयोजन; ४० महिला भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
कणकवली (प्रतिनिधी) : श्रद्धा, भक्ती आणि आपुलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या देवदर्शन यात्रेत तरंदळे गावातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कै. न्हानू सावंत व कै. सुहासिनी सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अमित सावंत आणि सून अस्मिता सावंत यांच्या वतीने तरंदळे गावातील महिलांसाठी विशेष देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत गावातील तब्बल ४० महिला भक्तांनी सहभाग घेत विविध देवस्थानांचे दर्शन घेत आध्यात्मिक आनंद अनुभवला.
या देवदर्शन वारीची सुरुवात तरंदळे गावची ग्रामदेवता श्री टेवणादेवी मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर श्री राऊळ महाराज मठ, श्री माऊली मंदिर, भालचंद्र मठ, वेतोबा मंदिर, घोडेमुख मंदिर, यशवंत गड, श्री गजानन महाराज मंदिर आदी धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली. तसेच सागरेश्वर बीच, वेंगुर्ला झुलता पूल आणि लाईट हाऊस याठिकाणीही महिलांनी फेरफटका मारत निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला.
संपूर्ण यात्रेदरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. देवस्थानांमध्ये दर्शन घेताना महिलांनी श्रद्धेने पूजा-अर्चा केली. एकमेकींसोबत आनंदाचे क्षण अनुभवत, भजन-गजर आणि भक्तीमय वातावरणात ही देवदर्शन वारी उत्साहात पार पडली. सायंकाळी सुमारे ७ वाजता सर्व महिला तरंदळे गावात परतल्यानंतर यात्रेची सांगता करण्यात आली.
‘काम तुमचं, प्रयत्न आमचे’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी
अमित सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘काम तुमचं, प्रयत्न आमचे’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना गावाबाहेरील महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेल्या या उपक्रमाचाच एक भाग म्हणून महिलांसाठी देवदर्शन वारीचे आयोजन करण्यात आले होते.
ही यात्रा यशस्वी करण्यासाठी गीता मुणगेकर, वनिता कदम, नम्रता देवलकर आणि कार्तिकी सावंत यांनी नियोजन केले. तसेच अनिल परब-तरंदळे, धनंजय तेली, नितीन हरमळकर-शिवडाव आणि चिंतामणी तिरोडकर-कोंडये या मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती अमित सावंत यांनी दिली.
श्रद्धा, भक्ती आणि गावकीच्या जिव्हाळ्याला जोडणारी ही देवदर्शन वारी महिलांसाठी आनंददायी आणि अविस्मरणीय ठरली.













