अंगणवाडी मुलांना शालेय साहित्य वाटप, मोफत आधार व फार्मर आयडी कॅम्प आणि विकासकामांचे होणार भूमिपूजन आणि लोकार्पण
देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून रोजी भाजपा पडेल मंडलामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण पडेल मंडलात हा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि सेवाभावी वृत्तीने साजरा केला जाणार असल्याची माहिती पडेल मंडलाचे तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी दिली. यावेळी देवगड पं. स. सभापती गणेश राणे, जि. प. सदस्य संजय बोंबडी, पं. स. सदस्य रवी तिर्लोटकर, माजी सभापती रवी पाळेकर, माजी उपसभापती डॉ. अमोल तेली, पं स सदस्य अंकुश ठुकरूल, पडेल सरपंच भूषण पोकळे, फरीद काझी, महिला तालुकाध्यक्ष संजना आळवे उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्ले जिल्हा परिषद गटातील अंगणवाडीतील बालकांना खेळणी व अंगणवाडी सेविकांना मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे. पोंभुर्ले जिल्हा परिषद गटामध्ये बालकांच्या शिक्षणाला आणि आनंदाला प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या गटातील एकूण ३३ अंगणवाडी केंद्रांमधील १७० हून अधिक मुलांना शालेय उपयोगी वस्तू आणि खेळण्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच अंगणवाडी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना छत्री वाटप करून त्यांच्या सेवेचा गौरव केला जाणार आहे. पुरळ जिल्हा परिषद विभागात मोफत आधार व फार्मर आयडी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या शासकीय गरजा लक्षात घेऊन पुरळ जिल्हा परिषद गटामध्ये मोफत आधार कार्ड नोंदणी/दुरुस्ती आणि फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना एकाच छताखाली आणि एकाच वेळी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करता येणार आहे.
मंत्री नामदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पडेल आणि बापार्डे जिल्हा परिषद गटात मंजूर झालेल्या आणि पूर्णत्वास गेलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पडेल आणि बापार्डे जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी विकासकामे मंजूर झाली आहेत. या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर दोन्ही गटांमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडणार आहे. यामुळे पडेल आणि बापार्डे परिसराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. “आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस केवळ केक कापून साजरा न करता, तो समाजोपयोगी उपक्रमांनी आणि विकासकामांच्या माध्यमातून साजरा केला जावा, हाच पालकमंत्री नितेश राणे यांचा मानस असतो. त्यानुसार भाजपा पडेल मंडलाच्या वतीने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष नारकर यांनी सांगितले. २३ जून रोजी होणाऱ्या या सर्व लोककल्याणकारी कार्यक्रमांना पडेल मंडळातील नागरिक, शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पडेल मंडल भाजप व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












