कुडाळ (प्रतिनिधी) : महिलांमध्ये जर जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती घेऊन जनजागृती झाली तर त्यांच्या मध्ये सत्य काय आणि चलाखी काय हे लक्षात येईल आणि भोंदूबाबा व जादूटोणा करणाऱ्यांच्या मागे न लागता या जागृत झालेल्या महिला अशा भोंदूबाबांकडे समस्यासाठी न जाता त्यांचे भांडाफोड करतील आणि त्यांची दुकाने बंद करतील . तुम्ही हा कायदा मनापासून समजून घ्या आणि अशा भोंदूगिरीच्या विरोधात आवाज उठवा असे आवाहन गणेश श्रीकांत हुक्किरे वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सिंधुदूर्ग यांनी केले.
सामाजिक न्याय भवन विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ जळगाव आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन या योजने अंतर्गत जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम अंतर्गत कुडाळ तालुक्यातील बचत गटाच्या सर्व महिलांसाठी जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान अल्पबचत सभागृह पंचायत समिती कुडाळ येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते .त्यावेळी ते बोलत होते . यावेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, अभाअनिस कार्यकर्ते योगेश वराडकर, ज्योत्स्ना जाधव, सुप्रिया वालावलकर, विशाल डोईफोडे, नितिन गावडे सर्व प्रभाग समन्वयक, अतूल दळवी अभाअंनि समिती कुडाळ उपाध्यक्ष, उज्ज्वला येळावीकर महिला संघटिका अभाअंनिस सिंधुदुर्ग, विलास चेंदवणकर, दिपक जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी विजय चौकेकर यांनी महिलांमध्ये असणाऱ्या विविध अंधश्रद्धा कशा निर्माण होतात व त्याचे आपण निराकरण भोंदूबाबांकडे जाऊन कसे करतो याची सविस्तर माहिती दिली यामध्ये भोंदूबावांकडे जाऊन नवस बोलणे, करणी काढणे, भानामती करणे, अंगात देवी येणे, भूत लागणे आदी प्रकार कसे घडतात याची संतांच्या अभंगातून उदाहरणे देऊन समजावून दिले . यामध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगताना नवसे कन्यापू्त्र होती , तर का करणे लागे पती . असे परखड विचार तुकाराम महाराजांनी मांडले तर तुकडोजी महाराज सांगतात संत धनवैभव अर्पिती मग भिकारी ना दिसती,
संत मुले देती मग जगी वांझ का रहाती, संत बिमारी वसविती मग बुवाचेच प्राण का जाती, जगी कोणीच ना मरती ऐसे का होऊ नये. असे संतांच्या अभंग ओव्यातून कायदा समजावून दिला . तर महिलांवर भूत येणे अथवा देवी येणे यासाठी महिलांमधील हिस्टेरिया, मॅनिया, सिझोफेनिया आदी आजाराची लक्षणे समजावून दिली . भोंदू बाबा हातचलाखीने विविध चमत्कार करतात हे समजून न घेतल्याने महिलांना ते भोंदूबाबाने अलौकिक सामर्थ्यांने केलेत असे वाटतात आणि महिला त्या बाबांना नमस्कार करतात .त्यामुळे असे भोंदू बाबा महिलांची सहज फसवणूक करतात . अनेक चमत्कार भोंदू बाबा कसे करतात हे प्रत्यक्ष त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली. आपला विवेक जागृत ठेऊन यशस्वी जीवन जगण्याचे आवाहन केले.

योगेश वराडकर यांनी आपले नशिब जन्मताच ठरते का? एकाच वेळी एकाच ठिकाणी जन्मलेल्या बालकांचे भविष्य सारखे असते का? याची सविस्तर माहिती दिली त्याच बरोबर आपल्यात अलौकिक शक्ती आहे असे सांगून मनातील शब्द कागदावर उमटविला तर तो शब्द न वाचता कसा ओळखतात ह्याची माहिती सविस्तर दिली.
काही महिलांनी आपली भोंदू बाबांनी फसवणूक कशी केली होती हे मनोगतात सांगितले व आता या पुढे भोंदू बाबांकडे कोणत्याही समस्येसाठी जाणार नसल्याची शपथ घेतली.

ज्योस्ना जाधव प्रभाग समन्वयक यांनी आभार प्रदर्शनात आज महिलांना एक नवीन दिशा प्राप्त झाल्याचे सांगून महिलांसाठी एक अतिशय उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश राठोड कुडाळ तालुका व्यवस्थापन कक्ष व्यवस्थापक व सर्व प्रभाग समन्वयक यांचे विशेष सहकार्य लाभले.













