पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने मोहन सावंत यांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील जाणवली गावचे पोलीस पाटील मोहन सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट अधिकारी, उत्कृष्ट कर्मचारी तसेच उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जाणवली गावचे पोलीस पाटील मोहन सावंत यांची यावर्षीच्या उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कारासाठी महसूल विभागाच्या वतीने निवड करण्यात आली होती. शनिवार 1 ऑगस्ट रोजी ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मानचिन्ह देऊन मोहन सावंत याना सन्मानित करण्यात आले.मोहन सावंत हे मागील सलग18 वर्षे जाणवली गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. महसूल आणि पोलीस विभागाशी निगडित गावपातळीवरील कामे पोलीस पाटील या नात्याने ते इमानेइतबारे पार पाडत आहेत. गावात शांतता आणि सलोखा टिकून राहावा यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली आहे. तसेच महसूल विभागाशी निगडित विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये त्यानी नेहमीच मोलाचे सहकार्य केले आहे. जाणवली गावासह सध्या ते कणकवली शहराचा पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.तसेच तरंदळे पोलीस पाटील म्हणूनही त्यांनी 7 वर्षे अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता.जनतेला आवश्यक असणारे सर्व दाखले मोहन सावंत नेहमी जनसेवा म्हणून तत्परतेने पोच करतात. मोहन सावंत यांच्या सेवाभावी वृत्तीच्या कार्यशैलीची दखल घेत त्यांना जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!