कणकवली च्या प्रियानी पवार चा सिंगापूरात डंका

आंतरराष्ट्रीय गणित व मानसिक अंकगणित स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

जगभरातील 2 हजार स्पर्धकांमधून प्रियानी ठरली यशाची मानकरी

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी कणकवली शहरातील चिमुकली कुमारी प्रियानी पूनम अनिल पवार हिने केली आहे. सिंगापूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक अंकगणित (IAMA) स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक पटकावत केवळ कणकवली किंवा सिंधुदुर्गच नव्हे, तर संपूर्ण भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. जगभरातील तब्बल दोन हजार स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या आणि अचूक गणिती कौशल्याच्या जोरावर प्रियानीने मिळवलेले हे यश अत्यंत गौरवास्पद मानले जात आहे.

शनिवार, 1 ऑगस्ट रोजी सिंगापूरमध्ये ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा उत्साहात पार पडली. जगातील विविध देशांतील निवडक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारतातून केवळ 31 विद्यार्थ्यांची निवड झाली होती, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फक्त दोन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यापैकी प्रियानी पवार हिने आपल्या अफाट एकाग्रतेने, वेगवान विचारशक्तीने आणि मानसिक अंकगणितातील उत्कृष्ट प्रभुत्वाच्या बळावर तिसरा क्रमांक पटकावत भारताची मान अभिमानाने उंचावली.

स्पर्धेसाठी प्रियानी 30 जुलै रोजी भारतातून सिंगापूरला रवाना झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विविध फेऱ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करत तिने अंतिम फेरीतही आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. अत्यंत कमी वेळेत अचूक गणिती प्रश्न सोडविण्याच्या तिच्या कौशल्याने परीक्षकांनाही प्रभावित केले.

प्रियानी ही एड्युस्मार्ट इंक, कणकवली ॲबॅकस ॲक्टिव्हिटी सेंटरच्या संचालिका सोनाली पारकर यांच्याकडे ॲबॅकस आणि मानसिक अंकगणिताचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. सध्या ती कणकवली येथील पोदार सीबीएसई स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत असून एवढ्या लहान वयात मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रियानी ही शासकीय ठेकेदार अनिल पवार आणि पाटबंधारे विभाग, आंबडपाल येथील कनिष्ठ अभियंता पूनम पवार यांची कन्या आहे. मुलीच्या या दैदिप्यमान यशामुळे पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कणकवलीच्या या चिमुकलीने जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशामुळे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्येही नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. मेहनत, जिद्द, योग्य प्रशिक्षण आणि पालकांचे प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे शिखर गाठू शकतात, हे प्रियानी पवार हिने आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे कणकवली शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!