गुणवंतांच्या पंखांना ‘शोभा’ची उंच भरारी!

शिवराज मराठा विद्यालयात सौ. शोभा सामंत पुरस्कृत बक्षीस योजनेतून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

साळगाव (प्रतिनिधी) : गुणवंत, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या यशाला आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे सुरू करण्यात आलेल्या सौ. शोभा शरद सामंत पुरस्कृत बक्षीस योजनेचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. माजी विद्यार्थिनी असलेल्या सौ. शोभा सामंत (पूर्वाश्रमीच्या श्रीमती पुष्पलता अच्युत प्रभू तेंडोलकर) यांच्या या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून, शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण होत आहे. या बक्षीस योजनेअंतर्गत विद्यालयातून इयत्ता दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थिनींसाठी रु. ७ हजार, तर विद्यार्थ्यांसाठी रु. ५ हजार अशी रोख पारितोषिके देण्यात आली.

यावर्षी इयत्ता दहावीमध्ये कु. रसिका सूर्यकांत धुरी आणि कु. तुकाराम दत्ताराम हळदणकर, तर इयत्ता बारावीमध्ये कु. निकिता सुहास देवळी हिने प्रथम क्रमांक मिळवून या बक्षीस योजनेचा मान मिळविला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व एन.एम.एम.एस. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. दुर्वा निलेश धुरी हिचा विशेष गौरव करून तिला रु. ५ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मुकुंद धुरी, संस्थेचे सचिव तथा तेंडोलकर परिवाराचे सदस्य प्रदीप प्रभू तेंडोलकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष उमेश प्रभू तेंडोलकर, संस्थेचे संचालक तुकाराम गोडे, जनशिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या कार्यक्रम अधिकारी चैत्राली शिर्के, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गणेश परब,जनशिक्षण मध्ये ट्रेनर म्हणून काम पाहणारे श्री गावडे मुख्याध्यापक सलीम तकिलदार ,गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी संस्था सचिव प्रदीप प्रभू तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना,”सौ.शोभा सामंत यांनी सुरू केलेल्या बक्षिस योजनेमागील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याची तळमळ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिकाधिक लक्ष्य केंद्रित करावे या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी आपल्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवावा,”असा मौलिक संदेश दिला.

जनशिक्षण संस्था सिंधुदुर्गा चैत्राली शिर्के व गणेश परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ही आगळी वेगळी बक्षिस योजना कौतुकास्पद असून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती,आत्मविश्वास आणि यशाची प्रेरणा निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सलीम तकिलदार यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षक परशुराम नार्वेकर यांनी केले.

error: Content is protected !!